Thoughts of a Free Soul

क्रिकेट क्रिकेट क्रिकेट
क्रिकेटचे ते वाळवंट परि फुले पहा ही फुलती
उत्साहाचे वर्धन करण्या बाला नाचत येती
रटाळ केवळ खेळ असे हा क्रिकेटचा सारा
म्हणून वळतो मुलींकडे मग टी.व्ही. कॅमेरा
      "असे तमाशा हा तर सारा. क्रिकेट आहे कुठे ?"
      असे विचारित बसले सगळे आजोबा गोमटे
      क्रिकेटच्या त्या अतिरेकाने बेसुर झाले गाणे
      सुहास्यवदना हर्षबालिका सुसह्य करिती जिणे



डोडोच्या कविता
      सातवीची परिक्षा संपून शाळेला मे महिन्याची सुट्टी लागली होती. दरवर्षीप्रमाणे मी गावी आजीकडे गेलो होतो. नागकेसराचं फूल शोधण्यासाठी म्हणून मी गावालगत असलेल्या रानात गेलो होतो. तिथे डोडो दिसला. त्याच्याबरोबर झालेली प्रश्नोत्तरे खालील कवितेत दिलेली आहेत.

शोधायाला फूल सुगंधी गेलो होतो रानी,
दगडावरती बसलेला तो दिसला डोडो ज्ञानी.
मला पाहुनी हळूच हसला, "बैस इथे" वदला
आनंदाने मीही नंतर वंदन केले त्याला.
      "देशिल मजला उत्तर जर तू एका प्रश्नाचे
      फूल सुगंधी देइन तुजला सुंदर रंगाचे.
      उंच फेकले फळ हे जरि मी, खाली ते येते.
      सांग मला तू झटकन आता असे कसे ते होते ?"
           "नियम असती ठाउक मजला सगळे न्यूटनचे
           गुरुत्वीय ते बल रे आहे कारण ह्यामागचे."
           अचूक माझे उत्तर ऐकुनि प्रसन्न डोडो झाला
           झाडावरचे फूल सुगंधी मजला देता झाला.


गुढी पाडवा
आनंदाची उधळण करूनी आला गुढि पाडवा
प्रभू कृपेने यंदा नाही कसलीही वानवा
चला उभारू उंच गुढी अन बांधू तोरण दारी
नष्ट करूया समाजातली तमोवृत्ति ही सारी
    वनवासातुन घरी परतले रामप्रभू जेधवा
    प्रजाजनांना हर्ष जाहला तो हा गुढि पाडवा
    उत्साहाने बहरुनि आली नगरी पुरी अयोध्या
    घरोघरी मग उभारल्या त्या नितांत सुंदर गुढया


मायबोलीचा तिढा






इंग्रजीमधे भुसा दळोनी भुक्कड म्हणती अम्ही हिरे
मायमराठी केविलवाणी का व्हावे हे असे बरे ?
अमृतवाणी जिंके पैजा, वैभव गेले अता कुठे ?
विज्ञानाची कास धराया शब्दसंपदा थिटी पडे

वैचारिक ते लेख आणखी कथा, कवीता स्फुरलेल्या
वृत्तपत्र, मासिके तशा त्या दूरदर्शनी वाहिन्या
दिवसाकाठी लाखावरती शब्द गाळिती पहा कशा
सर्व शब्द एकत्र करुनही शब्दकोश तो इवलासा

विज्ञानाच्या किती ह्या शाखा तंत्रज्ञानही पुढे असे
मराठीत हे सर्व आणणे अशक्य ना तरि कठिण दिसे
भाषाशुद्धी करता करता सावरकरही थकले हो
रजोगुणी हे बहुजन त्यांना "अव्यवहारिक" म्हणती हो.


रामसेतू
उडाणटप्पू म्हणती सारे "रामायण ते नाहि खरे
रामचंद्र तर कधीच नव्हते पृथ्वीवरती खरेखुरे."
जमेल तेथून पैसा खाणे हे तर ह्यांचे ध्येय असे
रामसेतुचा चुथडा करण्या एक जाहले सर्व कसे
      प्रभु रामांचे जीवन अवघे सन्मार्गाची दिशा
      भुक्कड़ सारे साम्यवादी ते उगाच पिळती मिशा
      मंगलमय ते नाम प्रभूचे उगा न येइल ओठी
      गोडि चाखण्या भक्तिरसाची पुण्य पाहिजे गाठी
भक्तिरसाचे सेवन करुनी चढली धुंदी न्यारी
निष्प्रभ ठरती समाजवादी समतेचे व्यापारी
वंशज सारे दशाननाचे उगाच करिती गलका
"रामपथावर चालत राहू" विचार अमुचा पक्का
      समाजवादी, साम्यवादि अन कसले कसले वादी
      उगाच कुटती काथ्या, करती नसती वादावादी
      अर्थहीन ते च-हाट त्यांचे त्यात न काही राम
      भवसागर हा तरुनी जाण्या बोला "जय श्रीराम"










भले थोरले दगड टाकिती सागरात माकडे
"आपण येथे काय करावे ?" खारुताईंना प्रश्न पडे
"अंग करोनी ओले सारे, लोळिन वाळूमधे
झटकुन टाकिन सगळी वाळू नंतर दगडांमधे"

असे म्हणोनी झटकन उठली खारुताई चिमुकली        लागुनि धक्का प्लवंदमाचा खालि पड़े खारुली
रामसेतुच्या कार्यामध्ये सामिल ती झाली            तिला झेलण्या रामकरांची सज्ज होति अंजली
तिला बघोनी वानर हसले, केली त्यांनी थट्टा          पाठीवरुनी फिरली पावन रामप्रभूंची बोटे
बलवंतांना नगण्य भासे खारीचा वाटा               धन्य खारुली अजुनी मिरविते पाठीवरचे पट्टे

Comments or Suggestions Truthfulness Home
Hosted by www.Geocities.ws

1