परभणी जिल्ह्यात गोदाकाठी वसलेले आणखी एक टुमदार गाव म्हणजे रामपुरी बुद्रुक.
प्रभू श्रीरामचंद्राचे नाव धारण केलेल्या या छोट्याश्या गावाला प्राचीन वास्तुशिल्पाचा वारसा लाभलेला आहे
सध्या अस्तित्वात असलेल्या मंदिरांपैकी अतिशय नेटके मंदिर म्हणजे श्री मल्लिकार्जुन मंदिर
गाववस्तीपासून थोडेसे दूर गेल्यावर शुभ्र चुन्याच्या अच्छादनातील हे मंदिरशिल्प सुस्थितीत पहावयास मिळते.
अधुनिकतेच्या मोहात अडकून संपूर्ण सभामंडपात अंथरलेल्या नवीन फरशीच्या खाली मूळ रंगशिला लुप्त झालेली असून त्याचे कोरीव स्तंभ मात्र साक्ष म्हणून उभे आहेत.

सोळा खांबांची रचना, पुढे अंतराळ आणि मग गर्भगृह अशी शास्त्रीय मांडणी केलेले हे मंदिर.
मंदिरशिल्पांच्या चित्रमालिकेबाबत परवा एक आश्चर्याचा सुखद धक्का बसला.
मंदिर शिल्पांच्या अभ्यासाची ओढ निर्माण झाल्यापासून ज्यांची पुस्तके मार्गदर्शनासाठी संदर्भग्रंथ म्हणून वापरतोय त्या डॉ. प्रभाकर देव सरांचा फोन आला.
ही चित्रमालिका सरांच्या पाहण्यात येणे आणि त्यांनी ते आवडल्याचे सांगण्यास फोन करणे म्हणजे या चित्रांना मिळालेले एक प्रमाणपत्र आहे असे मी मानतो.
मंदिरस्थापत्य शास्त्राविषयी सरांनी त्यांच्या ओघावत्या शैलीत सुमारे अर्धा तास अनमोल मार्गदर्शन केले आणि शेवटी या चित्रांचे प्रदर्शन करण्याबाबत सूचवले.
एवढ्या ज्येष्ठ तज्ज्ञ अभ्यासकाचे आशीर्वाद मिळाल्याने चित्रमालिकेचे सार्थक झाल्याचे मनोमन वाटले.
श्री सुरेश जोंधळे यांचे मनःपूर्वक धन्यवाद ज्यांच्या मुळे श्री देव सरांपर्यंत ही रेखाटने पोहचली