गाव विकासाच्या दिशेने .......

रामपुरी बुद्रुक मानवत तालुक्यातील गोदावरी नदीच्या काठी वसलेले सुमारे पाच हजार लोकसंख्येचे गाव.. काळी
कसदार जमीन, ऊस, केळी,सोयाबीन, कापूस त्यामुळे आजूबाजूच्या पंचक्रोशीत सदन म्हणून सुपरिचित
असलेले गाव परंतु वीस वर्षापूर्वी शिक्षण क्षेत्रापासून दूर असलेलं गाव.. आज शिक्षण क्षेत्रात जिल्ह्यातच नव्हे तर
राज्याचे नावलौकीक होईल अशा दर्जाचं काम करत आहे. रामपुरी गावात सुमारे हजार वर्ष जुने असलेले
पुरातन मल्लिकार्जुन मंदिर असून पुरातन शिल्पे सुद्धा आहेत.
जनजागृती झाल्याविन न मिटे समाजाचे दैन या उक्तीप्रमाणे रामपुरीत जनजागृती व्हावी व लोकसहभागातून गाव निर्माण व्हावे तसेच
ज्या विद्यार्थी शेतकरी व नागरिकांनी शिक्षण, शेती व सेवा क्षेत्रात उत्कृष्ट काम करून रामपुरी चे नाव उंचावले आहे
त्यांचा गावाकडून नागरी सन्मान व्हावा म्हणून बळीराजा महोत्सव व रामपुरी भूषण पुरस्कार चे आयोजन ग्रामपंचायत आजी माजी कर्मचारी अधिकारी संघ व सर्व ग्रामस्थ रामपुरी यांच्या संयुक्त विद्यमाने 2017 वर्षी पासून करण्यात येते.
2017 वर्षी
1)पेरे पाटील सरपंच आदर्शगाव पाटोदा
2) कृषिभूषण कांतराव काका झरीकर
3) विठ्ठल भुसारे उप शिक्षनाधिकारी
यांनी विविध विषयावर जनजागृतीपर प्रबोधन केले
2018 वर्षी सुद्धा
1) माननीय चंदू पाटील मारकवार सरपंच आदर्शगाव राजगड जिल्हा चंद्रपूर
2) शिक्षण क्षेत्रातील नामांकित व्यक्ती श्री नितीन लोहट
3) माननीय विठ्ठल भुसारे उपशिक्षणाधिकारी जिल्हा परिषद परभणी हे
2019 वर्षी

1.मा.उद्धवराव गाडेकर महाराज पाटसुल अकोला
2.मा. महेश शिंदे ज्ञानदीप अकॅडमी पुणे
3. मा कृषीभूषण नाथराव कराड इंजेगाव परळी
हे उपस्थित होते
2020 साली कोरोना प्रादुर्भावाचा पार्श्वभूमीवर अतिशय मोजक्या जणांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम घेण्यात आला.
2021 यावर्षी वडाच्या मोहोत्सव रामपुरी भूषण सोहळ्यासाठी वक्ते म्हणून
1.मा. रविदादा मानव
2.मा. डॉ आसाराम लोमटे सर
सत्कारमूर्ती म्हणून
1.मा.पंजाबराव डख, हवामान तज्ञ गुगळी धामणगाव परभणी
2.मा. रामेश्वर नाईक कोरोना योद्धा कथा प्रसिद्ध डॉक्टर परभणी
हे उपस्थित आहेत
स्वतःला विकसित करून समृद्ध बनायचं असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही आणि या ध्येयाने प्रेरित होऊन आमच्या
गावची विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करत आहेत आणि आज रोजी आमचे गावातून
रामपुरी गावातून 2002 पासून आजपावेतो
----------------------- 32 डॉक्टर KEM मुंबई, JJ मुंबई, GMC
40 इंजिनीअर IIT पवई पासून NIT नागपूर पर्यंत,
7 क्लास वन अधिकारी DDR, DyCEO,ACST
12 Ph.D करून प्राध्यापक
सैन्य दलात मेजर, न्यायाधीश 5 बँक मॅनेजर,
3 PSI,
7 MBA ,
20 जण पोलीस गडचिरोली पासून मुंबईपर्यंत
50 हुन अधिक शिक्षक, 25 हुन अधिक वकील,
तसेच इतर विविध पदावर 50 हुन अधिक
अश्या 250 विविध उच्च पदावर रामपुरी चे सुपुत्र /सुपुत्री कार्यरत आहेत.

"रिकामा कशाला फिरतं, तुझ गावच नाही का तीर्थ" या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या उक्तीप्रमाणे आम्ही
रामपूरकर "माझं गाव माझं तीर्थ" समजून श्रम, वेळ, कौशल्य, बुद्धी व वित्त या पंचदानाच्या माध्यमातून गावाचा
सर्वांगीण शाश्वत विकास साधण्यासाठी प्रयत्नरत आहोत. याच भावनेने प्रेरित होऊन रामपूरी येथील
आबालवृद्ध,तरुण मंडळी मागील पाच वर्षापासून वृक्षवल्ली फाउंडेशन, शैक्षणिक क्रांती अभियान, गोदावरी
स्वच्छता अभियान व बळीराजा महोत्सव यांच्या माध्यमातून मोठ्या उत्साहात काम करत आहे. या सर्वांच्या
सहभागामुळेच आजचा कार्यक्रम सुद्धा संपन्न होत आहे.
मागील चार वर्षांमध्ये रामपुरी मध्ये विविध नाविन्यपूर्ण अभियान राबवून गावाच्या शिवारातील शासकीय जागेवर सुमारे
अकरा हजार वृक्ष लागवड करून तिचे संगोपन करण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने वड पिंपळ उंबर

कडूनिंब अशा देशी वृक्षांची लागवड , फळझाडांची लागवड, घनवन लागवड, बिहार पॅटर्न लागवड,
नदीकाठी बांबू लागवड, महापुरुषांच्या नावाने वृक्षलागवड, स्मृती वृक्ष, शुभेच्छा वृक्ष , सोहळा वृक्ष असे अभिनव
वृक्ष लागवड करण्यात आलेली आहे. याव्यतिरिक्त शेतकऱ्यांच्या बांधावर वृक्ष लागवड, अण्णा जगताप यांच्या
संकल्पनेतील एक मूल 30 झाडे अंतर्गत वृक्ष लागवडी मधून मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करून संगोपन केले जात आहे. या सर्वांचे फलित म्हणून रामपूरीचे नाव हरितग्राम म्हणून जिल्हाभर नावाजले जात आहे. या कामाची दखल
दूरदर्शन सह्याद्री सह विविध प्रसारमाध्यमानी घेतली. ही रामपुरीकरांसाठी आनंदाची व अभिमानाची बाब आहे.
यासाठी रामपुरी मधील युवकांचा सिंहाचा वाटा आहे हे विशेष करून सांगावे लागेल.
रामपुरीची आदर्शगावाकडे वाटचाल सुरू असून सुमारे 10 टक्के कामच रामपुरी मध्ये झालेले आहे. यापुढे जल जीवन

मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजना, स्वच्छता अंतर्गत घनकचरा सांडपाणी व्यवस्थापन, विविधपायाभूत सोयी-
सुविधा जसे की स्मशानभूमी-स्मृतिउद्यान, भव्य शाळाइमारत, सुसज्ज ग्रामपंचायत इमारत, शॉपिंग
कॉम्प्लेक्स, ग्रामीण कृषी बाजार स्थापन करणे यासारख्या विविध योजना सुद्धा रामपुरी मध्ये राबविण्यात येणार
आहेत.
अधिकारी-डॉक्टरांची रामपुरी सोबतच आता हरितग्राम रामपुरी म्हणून जिल्ह्यात नावलौकिक कमावला असून
लगतच्या काळात रामपुरी - स्मार्टग्राम, हेरिटेजग्राम, पर्यटनग्राम अशा विविध अंगाने आदर्शगाव म्हणून सुद्धा
उदयास येईल असा विश्वास व्यक्त करतो.
माझे सर्व गावकरी बांधव व मित्रमंडळी अतिशय उत्साहाने सर्व कार्यामध्ये सहभाग नोंदवत आहेत याचा मला सार्थ
अभिमान आहे. हा उत्साह टिकून राहील अशी खात्री आहे.
सर्वदूर पसरावी आपुली ख्याती
आम्ही रामपुरीकर म्हणताना
सर्वांची अभिमानाने फुगावी छाती॥
घडवी उच्चशिक्षित, अधिकारी
अन प्रगतिशील शेतकरी
होय,आमची रामपुरी लई भारी...॥ जगात जर्मनी तशी भारतात परभणी
जिल्ह्यात लईभारी आमची रामपुरी ॥
होय आमची रामपुरी .............
बळीराजा महोत्सव व रामपुरीभूषण सत्कार सोहळा हा कार्यक्रम रामपुरीकरांच्या लोकसहभागातून संपन्न होणारा
अभिनव असा उपक्रम असून सलग पाच वर्ष हा महोत्सव सुरू आहे ही रामपुरीकरांसाठी आनंदाची बाब आहे.
शेतकऱ्यांचा गौरव करणारा बळीराजा महोत्सव गावोगावी झाला पाहिजे.
लेखन
#ओमप्रकाश_मं_यादव
उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.परभणी
तथा भूमिपुत्र रामपुरी