|
पसायदान
दुरितांचे तिमिर जावो विश्व
स्वधर्मसूर्ये पाहो
जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात
पाप, दुष्टपणा, अधर्म, अनाचार ह्यांचा अंधःकार नष्ट व्हावा. संपूर्ण विश्वामध्ये
स्वधर्मरुपी सूर्याचा प्रकाश पडावा. जो जो ज्याची ज्याची इच्छा करेल त्याला ते
प्राप्त व्हावे.
कल्याणमय विश्व हे ज्ञानोबांचं मागणं. कल्याणमय म्हणजे नेमकं कसं त्याचं वर्णन
ज्ञानोबा करतात. आणि हे वर्णन करताना सर्व श्रोतृसमुदायाला जागृत करतात.
कल्याणमय विश्व उभं करण्यासाठी प्रत्येकाने आपापला वाटा उचलावा म्हणून ते प्रेरणा
देतात.
आता ते म्हणता आहेत, 'दुरितांचे तिमिर जावो'. पापाचा अंधार नाहीसा व्हावा. जे
खळांची व्यंकटी सांडो... तसंच हे आहे. ह्या साऱ्या विश्वातून पाप नष्ट होऊदे.
पुण्य जन्माला येऊ दे. अन्याय, अधर्म, अनाचार यांचा काळाकुट्ट अंधार नष्ट होऊदे.
न्याय धर्म सदाचार ह्यांचा प्रकाश उजळू दे.
हे केव्हा होईल? जेव्हा तुम्ही आम्ही सगळेजण आत्मपरीक्षण करू. आपल्या ठाईचं
अज्ञान दूर करू. होय अज्ञानच.
चांगल्या वाईटाचं भान नसणं, अहंकार असणं, मी म्हणतो तीच पूर्व दिशा, मीच काय तो
ज्ञानी.. हे असं वाटणं म्हणजे अज्ञान. ह्या अज्ञानातूनच पाप जन्माला येतं.
हे पाप, हे अज्ञान नष्ट व्हायला हवं. ज्ञानाचा, पर्यायाने पुण्याचा उदय व्हायला
हवा.
आता ज्ञान म्हणजे हो काय? आपण कॊण आहो? कसे असायला हवे? समाज म्हणजे काय? समाजाशी
आपण कसे बांधिल आहो? आपली कर्तव्ये काय? हे आणि असे सगळे असते ज्ञान. म्हणजेच
धर्म. धर्मो रक्षति रक्षितः
ज्याचे धारण केले असता म्हणजे ज्या प्रमाणे वागले असता जो आपले धारण करतो, किंवा
रक्षण करतो तो धर्म. अर्थात व्यक्ती म्हणून कुटुंबातील, समाजातील, राष्ट्रातील
विश्वातील, संपुर्ण निसर्गसृष्टीतील एक घटक म्हणून जी जी कर्तव्ये आपणास प्राप्त
होतात, त्यांचे पालन करणे म्हणजे धर्म. संपुर्ण सृष्टीचे भान ठेऊन आचरण करणे,
समष्टीचा विचार करणे, म्हणजे धर्म.
अश्याप्रकारे जेव्हा प्रत्येक जण आपल्या धर्माचे पालन करेल, अर्थात जेव्हा ह्या
स्वधर्म सूर्याचा उदय होईल, ज्ञानाचा प्रकाश चहुकडे पसरेल, तेव्हा पापाचा,
अज्ञानाचा अंधार नक्कीच नष्ट होईल.
आणि असं झाल्यानंतर मग ज्ञानोबा पुढे एक खूप मोठं मागणं मागतात. 'जो जे वांछील
तो ते लाहो'. ज्याची जी इच्छा आहे ती पूर्ण होवो. ज्याला जे हवे ते प्राप्त होवो.
पुन्हा एकदा ज्ञानबाची मेख! अहो, एखाद्याला बसल्याजागी आयतं स्वर्गसुख हवं असेल,
पण तसं ते नाही मिळायचं. एखाद्याला कष्टाशिवाय इंद्रपद हवं असेल, पण तसं ते नाही
मिळायचं. ज्ञानोबांनी मागितलेलं पसायदान परमेश्वराने त्यांना दिलेलं आहे हे खरं,
मग जो जे वांछील तो ते लाहो असं व्हायला हवं. पण कधी? ज्ञानोबांनी विश्व
स्वधर्मसूर्येपाहो, हे आधी लिहून ठेवलं आहे ना!
जो स्वधर्म पालन करेल, स्वतःची कर्तव्ये, जवाबऱ्या ह्यात आनंदाने मग्न होऊन जाईल,
तेव्हा त्याच्यामनात निर्माण होणारी इच्छा ही संपूर्णपणे सात्विक असेल.
विश्वकल्याणाचाच विचार त्या इच्छेत व्यक्त होत असेल. प्रत्येकाची अशी सात्विक
इच्छा नक्कीच पूर्ण होईल. कारण, हे असच पसायदान ज्ञानोबांनी मागितलं आहे.
दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्मसूर्ये पाहो
जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात
डॉ. हर्षदा पाध्ये
[email protected] |