|
|
|
|
'एकदिलाने पुढे जाऊ या'
आल्या विपदा जरी निरंतर वा मग येवो प्रलय भयंकर पायाखाली जळती निखारे वा वर्षू दे नित अंगारे तळहातावर ज्योत ठेवुनी जिद्दीने हा मार्ग क्रमूया एकदिलाने पुढे जाऊ या!
सुख-दु:खांतून, तूफ़ानांतून, वा असंख्य त्या बलिदानांतून अपमानांतून, सन्मानांतून शिशिरातून वा मग बहरातून ताठ छाती अन उन्नत माथा संकटांतुनी सदा ठेवू या एकदिलाने पुढे जाऊ या!
घोर तमातून वा किरणांतून, संथ प्रवाही वा भवऱ्यातून तिरस्कार अथवा प्रीतीतून पराभबातून अन विजयातून क्षणिक मोह या आयुष्यातील या जाळू या, अन संपवू या एकदिलाने पुढे जाऊ या!
समोर असता ध्येयाचा पथ नित्य चालणे हेच मनोरथ अपार श्रम परी हास्य मुखावरी यशापयश परी एक दृष्टि धरी समस्त अर्पुनी निरीच्छ केवळ आषाढातील मेघ होऊ या एकदिलाने पुढे जाऊ या!
प्रीतीला जरी वंचित यौवन अन काट्यांनी भरले जीवन उजाड आयुष्याचे उपवन जन-उद्धारा वेचू तनमन असंख्य त्यागाच्या समिधा या जीवन-यज्ञाला अर्पू या एकदिलाने पुढे जाऊ या!
माजी पंतप्रधान श्री. अटलबिहारी वाजपेयी यांच्या 'कदम मिलाकर चलना होगा' या हिन्दी कवितेचे मराठी रूपान्तर
[पूर्वप्रकाशित :
http://www.MarathiWorld.com]
जयन्त खानझोडे
|
स्वाभिमान
मिटले ओठ कधीही खुलणार नाही कितीही बोलाव आता, मी येणार नाही
माझ्या वाटेची सावली, तुझ्या आठवाने ऊन झाली कळ गेली काळजात परी, हाक मारणार नाही
तहानला जीव व्याकुळली डोळां स्वप्ने उद्याच्या आशांचे ओझे वाहणार नाही
शुष्क उसासे तुझे, मन माझे वेडेपिसे चूड दोन्ही कडांना परी जळणार नाही
बदलतात वाटा, देऊन वळणांचे त्रास गेल्या राती गेले दिस मनी जपणार नाही
अन्यायी घाव तुझे जिव्हारी लिंपणार नाही तुझ्या लहरींवर नौका माझी चालणार नाही
मिटले ओठ कधीही खुलणार नाही कितीही बोलाव आता, मी येणार नाही !
सौ. अनघा नितिन दिघे |
|
ताईची कविता
ताईमधली कवयित्री पुन्हा एकदा जागी झाली, श्रोता बनण्याची पाळी फ़क्त माझ्यावरच आली. अतिशय आदर्श श्रोता बनून तिच्यासमोर बसलो, तिने कविता सुरू करण्यापूर्वी थोडासा हसलो. गहन सुन्दर विचारांची कविता तिने माझ्या बालबुद्धीसमोर फ़ेकली, माझ्या हास्याचा त्रिफ़ळा उडवणारी जणू गुगलीच तिनं टाकली. आत्ता असं वाटतं आहे, उगीच आधी हसलो, अशीच घाई करून आयुष्यात अनेक चुका करून बसलो. ताईची कविता म्हणजे - जणू गीता आहे, अहो, उगीच सिरियस होऊ नका, शेवटी मीही आदर्श श्रोता आहे.
चेतन देशमुख |
|
[email protected]
सदाफ़ुली याहू! ग्रूपमधे सामील व्हा
![]()